मुंबई : वैद्यकीय पदवी नसताना केवळ गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून स्वत:ला डॉक्टर समजणाऱ्या मंडळींची गुन्हे शाखेने धरपकड सुरु केली. यात गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने ही कारवाई केली आहे.
गोवंडी, शिवाजी नगर परिसरात अशा बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी याठिकाणी छापा टाकला. महानगर पालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची मदत घेण्यात आली. येथील बैगनवाडी परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत, क्षमा या नावाने क्लिनिक चालविणाऱ्या पाच डॉक्टरावर कारवाई करण्यात आली आहे. ही मंडळी अधिकृत वैद्यकिय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल मध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवुन बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रुग्णांवर औषधोपचार करत होते.
अटक करण्यात आरोपीच्या क्लिनिक मधून स्टेथोस्कोप, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, अँँन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल ट्रे., सलायन बॉटल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे औषधे व साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. पाचही डॉक्टराविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीहो गुन्हे शाखेने वेळोवेळी कारवाई करत बोगस डॉक्टरांंची धरपकड़ केली आहे.