मुंबई : वैद्यकीय पदवी नसताना केवळ गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून डॉक्टर असल्यासारखे वावरणाऱ्यांची गुन्हे शाखेने धरपकड सुरु केली आहे. यात गोवंडीतून ५ बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने ही कारवाई केली आहे.गोवंडी, शिवाजीनगर परिसरात अशा बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी याठिकाणी छापा टाकला. महानगरपालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर यांची यावेळी मदत घेण्यात आली.येथील बैगनवाडी परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत, क्षमा या नावाने क्लिनिक चालविणाऱ्या पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मंडळी अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांवर औषधोपचार करत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या क्लिनिकमधून स्टेथोस्कोप, वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन, ॲन्टिबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल ट्रे, सलाईनच्या बाटल्या अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाचही डॉक्टरांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशिक्षित ‘टार्गेट’झोपडपट्टी भागातील अशिक्षित आणि गरिबांना टार्गेट करुन सुरुवातीला कमी पैशांत औषधोपचार करायचे. हळूहळू रुग्ण वाढताच पैसे वाढवून रुग्णांच्या जिवाशी ही मंडळी खेळत होती. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.
ना वैद्यकीय पदवी ना अनुभव... तरीही रुग्णांंवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 8:53 AM