तुम्ही फसवणुकीची अनेक प्रकरणे पाहिली असतील. यात फोन करुन बँकेतील अधिकारी असल्याचे सांगून ओटीपी घेऊन, तसेच लॉटरी लागल्याचे सांगून फसवणूक झाल्याची प्रकरणे अनेक समोर आली आहेत. सध्या दिल्लीत फसवणुकीचे वेगळे प्रकरण समोर आले आहे. ओटीपी, मेसेज न येताच बँक खात्यावरील ५ लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्लीतील एका चहा विक्रेत्याने आपले दुकान पाच लाख रुपयांना विकले. कर्जाची परतफेड करण्यासाठी ही रक्कम बँक खात्यात टाकली. ज्या बँकेकडून कर्ज घेतले होते त्या बँकेच्या नावे धनादेश दिला. चेक बाऊन्स झाल्याचे बँकेने सांगितल्यावर त्याला धक्का बसला. पासबुकमध्ये एन्ट्री करण्यासाठी गेला असता उखाटे यांच्याकडून पाच लाख रुपये काढण्यात आल्याचे निर्दशास आले. शाहदरा जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड आणि पैसे काढण्याच्या गेटवेद्वारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
Business Idea : कमी गुंतवणुकीत 'हा' बिझनेस सुरू केल्यास दरमहा होईल 50 हजार रुपयांची कमाई!
मोहम्मद रिजवान आलम हे जगतपुरी परिसरात कुटुंबासह भाड्याने राहतात. ते बिडी-सिगारेट, तंबाखू विकण्याचे काम करतात. यमुना विहार येथील उजीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत त्यांचे बँक खाते आहे. २०२१ पासून त्यांनी या खात्यात कोणताही व्यवहार केलेला नाही. गाझियाबाद जिल्ह्यातील अंकुर विहार, लोणी येथे ते चहा विकतात. चहाची गाडी त्यांनी नुकतीच विकली. त्यातून मिळालेले पाच लाख रुपये त्यांनी ३ मार्च रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा केले.
त्यांच्या दुकानावर बँकेचे कर्ज सुरू आहे. त्यामुळे त्यांनी कर्ज देणाऱ्या बँकेच्या नावे पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. ते ४ मार्च रोजी क्लिअरिंगसाठी ठेवण्यात येणार होते. पण कर्ज देणाऱ्या बँकेने त्यांना ३१ मार्च रोजी चेक बाऊन्स झाल्याचे सांगितले. खात्यात पैसे नसल्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले. रिझवानने तत्काळ बँकेत जाऊन पासबुकमध्ये नोंद करून घेतली. त्यांचे पैसे काढण्यात आल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार करुन गुन्हा दाखल केला.
बँकेत फोन नंबर अपडेट न करणे तोट्याचे ठरले
रिझवान यांच्याकडे जुना फोन नंबर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तो त्यांच्या बँक खात्याशी जोडला होता. सुमारे वर्षभरापूर्वी फोन हरवला तेव्हा त्यांना नवीन नंबर देण्यात आला. मात्र हा नवीन क्रमांक बँकेत अपडेट करण्यात आला नाही. पाच लाख रुपये बँकेत जमा केल्यानंतर हा मेसेज त्याच क्रमांकावर गेला, जो आता दुसराच वापरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. ही रक्कम एकाच व्यक्तीने हस्तांतरित केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.