नालासोपारा :- सचिन वाझे नावाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही मदत केलेली नसून मनसुख हिरेन या दोघांशीही माझा काडीमात्र संबंध नसल्याचा खुलासा नालासोपाऱ्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिनबुडाचे आणि माझी बदनामी करणारे आरोप करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणतेही कागदपत्रे किंवा पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे अन्यथा अशी बदनामी करू नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मनसुख प्रकरणात माझे नाव आल्याने मला आश्चर्य वाटत आहे. तसेच मला वाईट वाटते की इतक्या बड्या नेत्याने असे विधान केल्याचे.
देशाची सर्वोत्तम तपास यंत्रणा NIA उतरली असून महाराष्ट्र पोलीस, ATS तपास करत असून सत्य बाहेर येईल. हिरेन यांचा मृतदेह सापडल्यावर त्याचे लोकेशन वसई मिळाल्यावर कोणत्या तरी बिल्डरला वाचवण्यासाठी माझे नाव घेणे योग्य नाही. गुन्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला आहे. कोणतीही ट्रायल होऊन माझे गुन्हे साबीत झालेले नाही. यामुळे माझी बदनामी होईल असे वृत्त करू नये अशी विनंती करत आहे. कोणत्या बिल्डरला वाचवत आहे याबाबत मी स्वतः सर्वोच्च न्यायालयाला लिहून दिलेले आहे. माजी मुख्यमंत्री यांनी 2017 च्या एका गुन्ह्याबाबत बोलले त्या गुन्ह्यात मी कधीही आरोपी नव्हतो, त्या गुन्ह्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही तसा तपास अधिकाऱ्याचा अहवाल आणि सदर गुन्ह्याची चार्जशीटही न्यायालयात दाखल केलेली असून त्यांना कोणते कागदपत्रे पाहिजे असतील तर त्यांनी मागितली तर मी देईन यामुळे माझी बदनामी थांबवा असे लोकमतला सांगितले.
माजी मुख्यमंत्र्यांचे आरोप.......
2017 च्या एका खंडणी प्रकरणात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. एकाचं नाव धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव सचिन वझे आहे. मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. 40 किमी दूर मृतदेह सापडतो…गावडेकडे जाण्याचं कारण काय आहे. याच्यापेक्षा अधिक काय पुरावे हवेत? 201 अंतर्गत सचिन वझेंना तात्काळ अटक का नाही? 302 तर सोडून द्या…हा राजकारणचा विषय नाही पण थेट पुरावे असतानाही 201 अंतर्गत अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती तर ती परत कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला त्यामुळे हे उघडकीस आलं आहे असाही आरोप केला आहे.