अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. आयकर रचनेत कोणताही बदल न झाल्यानं सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशा आली. गेल्या आठ वर्षांपासून टॅक्स स्लॅब जैसे थे आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग नाराज आहे. त्याच्या डोक्यात घराच्या बजेटची चिंता आहे. मात्र काही लोकांचं बजेट सदैव उत्तम असतं. काळी कमाई करणाऱ्या अशाच काही व्यक्ती सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये वास्तव्यास असलेल्या आर. एन. सिंह यांच्यावर घरावर गेल्या ३ दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. सिंह माजी आयपीएस अधिकारी आहेत. सिंह यांचा मुलगा घरातील बेसमेंटमध्ये एक खासगी लॉकर फर्म चालवतो. हे लॉकर भाड्यानं दिलेत जातात. या ठिकाणची झडती घेऊन आयकर विभागानं कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. हा पैसा नेमका कोणाचा आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बेसमेंटमध्ये आयकर विभागाला ६५० लॉकर सापडले आहेत.
आर. एन. सिंह यांनी पोलीस महासंचालक म्हणून काम केलं आहे. 'मुलगा फर्म चालवतो. कमिशन घेऊन लॉकर भाड्यानं देतो. त्यात माझेही २ लॉकर आहेत. पण त्यामध्ये काहीच नाही,' असं सिंह यांनी सांगितलं. 'मी गावी गेलो होतो. छापा पडल्याची माहिती समजताच नोएडामध्ये आलो. मी माजी आयपीएस अधिकारी आहे. माझा मुलगा इथे राहतो. तो लॉकर भाड्यानं देतो. सर्व लॉकर्स बेसमेंटमध्ये आहेत,' असं सिंह म्हणाले.
'माझा मुलगा लॉकर भाड्यानं देतो. बँकाप्रमाणेच तो लोकांना लॉकरची सुविधा देतो. त्यामध्ये आमचेही दोन लॉकर आहेत. आयकर विभागाकडून तपास सुरू आहे. जवळपास सर्व लॉकर तपासण्यात आले आहेत. त्यांनी ताब्यात घेतलेल्या सगळ्या पैशांशी संबंधित कागदपत्रं आमच्याकडे आहेत. काही दागिनेदेखील सापडले आहेत. त्याचाही तपशील आमच्याकडे आहे,' असा दावा सिंह यांनी केला.