नोएडा
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नोएडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नोएडात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याच दरम्यान एका अज्ञात ग्राहकानं दुकानदारानं जेवण देण्यास नकार दिल्यानं त्याची गोळी झाडून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोएडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. आरोपी अद्याप फरार आहे.
ग्रेटर नोएडाच्या बीटा-२ परिसरात ओमेक्स आरकेडिया मॉलमध्ये एक ऑनलाइन फूड ज्वाईंट शॉप सुरू होतं. पण नाइट कर्फ्यूची वेळ सुरू झाल्यानंतर दुकानदारानं पार्सल सेवा देणं बंद केलं. याच ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. घटनास्थळावर ऑनलाइन फूड ज्वाइंटचा मालक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहायला मिळाला. त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती. यानंतर दुकान मालकाला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
संबंधित प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. संबंधित दुकानदाराकडे रात्री उशिरा जवळपास १ वाजताच्या सुमारास दोन ग्राहक गेल्या तीन वर्षांपासून नेहमी जेवण करण्यासाठी येत असत. यावेळी ते दुकानात आले असता दुकान बंद होतं. त्यामुळे दुकानदारानं जेवण देण्यास नकार दिला. यात दुकानदार आणि त्या दोन ग्राहकांमध्ये वाद झाला. काही वेळानंतर भांडण थांबलं आणि दोघंही घटनास्थळावरुन निघून गेले होते. पण दोन तासांनी दोघंही दुकानाजवळ पुन्हा परतले आणि दुकानदारावर गोळीबार केला. दुकानदारावर गोळी झाडून दोघंही घटनास्थळावरुन फरार झाले. या परिसरात सध्या ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.