नोएडामध्ये सायबर फ्रॉडची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे सायबर क्रिमिनल्सनी नैनिताल बँकेला लक्ष्य केलं आणि १६ कोटींहून अधिक रक्कम होती. बँकेच्या बॅलेन्स शीटमध्ये काहीतरी गडबड आढळून आल्याने फसवणुकीचं हे प्रकरण उघडकीस आलं. सायबर क्रिमिनल्सने ही संपूर्ण घटना अत्यंत हुशारीने घडवून आणली. यासाठी बँकेचा सर्व्हर हॅक करून ८९ अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. सायबर क्रिमिनल्सने मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड वापरला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नोएडातील सेक्टर ६२ मध्ये असलेल्या नैनिताल बँकेशी संबंधित आहे. या सायबर फ्रॉडची सुरुवात जून २०२४ मध्ये झाली. बँकेचा सर्व्हर हॅक करून बँक मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड मिळवला होता. हा पासवर्ड वापरून फसवणूक करणाऱ्यांनी बँकेच्या RTGS (रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट) चॅनलद्वारे पैसे ट्रान्सफर केले.
फसवणुकीचं संपूर्ण प्लॅनिंग १६ जून ते २० जून २०२४ दरम्यान करण्यात आलं होतं. यावेळी सायबर क्रिमिनल्सने नैनिताल बँकेचा सर्व्हर हॅक करून मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड वापरून बँकेच्या आरटीजीएस सिस्टममध्ये घुसखोरी केली. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी बँकेच्या इंटरनल सिस्टममध्ये बदल करून ८९ खात्यांमध्ये १६.५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. ही फसवणूक एवढ्या चतुराईने करण्यात आली की, बँकेला याची लगेच कल्पना आली नाही.
अनेक दिवस बॅलेन्स शीटमध्ये गडबड आढळून आल्यानंतर बँकेने चौकशी सुरू केली असता संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. बँकेच्या आयटी मॅनेजरने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सेक्टर ३६ येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या संपूर्ण घटनेने बँकेच्या सिक्योरिटी सिस्टीममध्ये कमतरता असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी शोधून काढलं. यामध्ये हर्ष नावाच्या आरोपीचा सर्वात आधी शोध लागला. त्यानेच हा मोठा कट रचला होता. हर्षसोबत त्याचा भाऊ, चार्टर्ड अकाउंटंट शुभम बन्सल आणि इतर काही सहकारीही होते. हर्षनंतर आता कुलदीप नावाचा आणखी एक आरोपी सापडला आहे. या फसवणुकीत कुलदीपच्या बँक अकाऊंटचा वापर करण्यात आला. त्याबदल्यात कुलदीपला पाच लाख रुपये कमिशन मिळाले.