ठाणे - मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट ठाणे कोर्टाकडून जारी करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून मदतीसाठी मलबार हिल पोलिसांना तसे पत्र दिले आहे. परमबीर सिंगयांच्या विरोधात ठाण्यात कोपरी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.
परमबीर सिंग यांचं 'गुजरात' कनेक्शन उघड, हवाला ऑपरेटरला अटक
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च, २०२१ रोजी दिले होते. त्या पत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला. या आयोगासमोर सिंग यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेले महेश पांचाल यांनी शुक्रवारी शपथपत्र सादर केले. परमबीर यांच्या वतीने या शपथपत्रात अशी भूमिका मांडण्यात आली आहे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती, तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत, तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.