Nora Fatehi Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हिची सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी केली. शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोराची पुन्हा एकदा चौकशी केली. रिपोर्ट्सनुसार, २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात नोराला ५० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटलीस? अशा स्वरूपाचे प्रश्न होते, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी ईडीने अभिनेत्रीची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली आहे.
नोरा फतेहीला भेट मिळाली होती BMW कार
रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेहीने सांगितले की, मी सुकेशच्या पत्नीला एका नेल आर्ट फंक्शनमध्ये भेटले होते. तिथेच त्याने मला BMW कार भेट दिली. त्या दोघांचा गुन्हेगारी इतिहास आहे, याची मला कल्पना नव्हती. यासोबतच नोराने सांगितले की, माझा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्याशीही कोणताही प्रकारचा संबंध नाही.
नोरा फतेहीने दिली 'ईडी'च्या काही प्रश्नांची उत्तरे
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने नोराला विचारले की सुकेशने नोरा किंवा तिचा फॅमिली फ्रेंड बॉबी खान यांना BMW कार गिफ्ट केली होती का? यावर नोरा म्हणाली की सुरुवातीला मला सुकेशने कारबद्दलची ऑफर दिली होती. त्यावर मी आधी 'ठीक आहे' असं म्हणाले होते. पण नंतर मात्र मी त्याला सांगितले की मला त्याची गरज नाही. त्यामुळे मी बॉबीलाही याची माहिती दिली. या संदर्भात बॉबीचे सुकेशशी बोलणे झाले. मी बॉबीला सांगितले होते की जर तुला हवी असेल तर तू ही कार स्वत:कडे ठेवून घे. मला ही कार नको. पण सुकेशने मात्र स्पष्टपणे सांगितले की मी ही BMW कार फक्त नोराला गिफ्ट केली होती. नोराला BMW कार आवडली असल्याने मी तिला गिफ्ट दिले. तिचा फॅमिली फ्रेंड असलेला बॉबी याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता.
१२ सप्टेंबरला जॅकलीनची होऊ शकते चौकशी
दिल्ली पोलिस १२ सप्टेंबरला जॅकलिनची चौकशी करणार आहेत. वास्तविक पाहता, बुधवारी दिल्लीच्या पटियाला कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना जॅकलिनची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता १२ तारखेला तिची चौकशी केली जाऊ शकते. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात भेटवस्तूंचे अनेक व्यवहार झाले. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासह अनेकांची ईडी चौकशी करत आहे. ईडीने यापूर्वी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात ईडीने लिहिले आहे की सुकेशने दोन्ही अभिनेत्रींना कोट्यवधी रुपयांची रोकड आणि भेटवस्तू दिल्या होत्या.