मुंबई - वनराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास राम मंदिर रेल्वे स्थानकजवळून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी विजय साहू (वय - २९) आणि उत्कर्ष श्रीवास्तव (वय - २२) या दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मीरा रोड येथील काशिमीरात राहणारा विजय हा रिक्षा चालक असून त्याची काही दिवसांपूर्वी उत्कर्षसोबत मैत्री झाली होती. कानपुरहुन उत्कर्ष हा दोन महिन्यांपूर्वी मुंबईत कामानिमित्त आला होता असं पोलीस तपासात त्याने सांगितलं अशी माहिती ज्योत्स्ना रसम यांनी दिली. हॉटेलमध्ये राहत असताना उत्कर्षची विजयसोबत ओळख झाली. दोघांनी नंतर बेकायदा शस्त्र विकण्याचा धंदा सुरु केला होता. या दोघांना राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांनी पकडले त्यावेळी त्यांच्याकडे २ देशी पिस्तूल, ४ मॅगझीन, २० काडतुसं सापडली. वनराई पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम ३ -२५ अन्वये बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.