वडगाव मावळ : लग्नात सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं पालन न करणाऱ्या आणि ५० व्यक्तींची परवानगी असतानाही अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, वधूच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नसराईतील मावळात पहिला गुन्हा दाखल शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीट येथे विवाह संपन्न झाला तेव्हा ही बाब समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस कर्मचारी एस. पी. घोटकर यांनी फिर्याद दिली आहे. राहूल रघूनाथ वरघडे, वय ३२, आकाश अनिल राउत, वय २६ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांन निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , वडगाव मावळ मधील हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीटमध्ये विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते त्याला पोलिसांकडून ५० व्यक्तींसह रीतसर परवानगी देण्यात आली होती, यासाठी पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला होता. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थीचे पालन करून विवाह होत आहे का हे पाहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली. दरम्यान, विवाहाच्या स्थळावर नियमांची पायमल्ली करत ६० ते ७० जण लग्नास उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टसिंगच्या नियमाचंही पालन होताना पोलिसांना दिसलं नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वधूचे चुलते राहूल रघूनाथ वरघडे आणि हॉटेलचे मॅनेजर आकाश अनिल राउत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचे संकट व लॉकडाऊन मुळे गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात साध्या पध्दतीने विवाह पार पडले. परंतू, गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून वडगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या विवाह समारंभाला मोठी गर्दी झाली होती. ज्या भागात कोरोनाचे रूग्ण आहेत तेथील लोक लग्नाला येत होती. आजपर्यत वडगाव शहरात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही. या गर्दीमुळे शहराला कोरोनाचा धोका होऊ शकतो. म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर वरिष्ठांचा आदेश आल्यावर पोलिसांना जाग आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.