मुंबई - मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, ठाणे ग्रामीण या पोलीस ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार, दाऊद गँगशी संबंधित तसेच मुंबईतील साथीदारांच्या मदतीने स्वत:ची गँग बनवून खंडणी गोळा करणे, अपहरण करणे असे प्रकार करून पैसे गोळा करणारा कुख्यात आरोपी अख्तर कासमअली मर्चंट (५६) याला पालघरच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या सेलने सापळा रचून नालासोपाऱ्यातून मंगळवारी अटक केली.बांगलादेश येथून पासपोर्ट बनवून नैरोबी येथे जाण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने तो मुंबईत परतला होता. तो नालासोपारा येथील रहिवाशी आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता. मर्चंट दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित असून मुंबईतील दाऊदच्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी स्वतःची गँग तयार केली होती. ही गँग खंडणी गोळा करणे, त्यासाठी अपहरण करण्याचे काळे धंदे करीत असे. मर्चंट याचे ड्रग्ज माफियांशीही संबंध आहेत. त्याच्याविरोधात गुजरातसह महाराष्ट्रातील ठाणे ग्रामीण, मीरा रोड, नागपाडा, मुंबई परिसरात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
भाईंदरमधील नयानगर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. फरार मर्चंट बांगलादेश आणि नेपाळमध्ये लपून राहिला होता. नैरोबी येथे जाण्याचा प्रयत्न फसल्याने मर्चंट मुंबईत नालासोपारा येथील आपल्या घरी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यावरून पाटील यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, चंद्रकांत ढाणे, पोलीस हवालदर एस. एच. निकोळे, पी.एस. तुरकर, एम. व्ही. चव्हाण, जे. एन. गोवारी यांच्यासह सापळा रचला होता. सोमवारी रात्री सिव्हीक सेंटर चौकात येथे मर्चंट याला अटक केली. चौकशी करून मर्चंटला नयानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.