लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर आणि टोळीविरुद्ध नवीन कामठी ठाण्यातही शुक्रवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला. विकास जैन नामक व्यापाऱ्याची सुमारे दोन कोटींची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.जैन यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी वडोदा (ता. कामठी) येथील १. १६ हेक्टर जमीन १२ मार्च २००३ ला रीतसर खरेदी केली होती. त्याचा ७/ १२ देखील जैन यांच्या नावे करण्यात आलाहोता. या शेतजमिनीवर त्यांचा मालकी हक्क आणि कब्जा असल्याने त्यांनी तेथे गोदाम तयार करण्याची तयारी सुरू केली. त्यानुसार, २३ ऑक्टोबरला ते वडोदा येथील पटवाऱ्याला भेटले. त्यांनी नवीन सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी या जमिनीची ७ फेब्रुवारी २०१५ ला संतोष आंबेकरच्या नातेवाईकाने रजिस्ट्री केल्याचे जैन यांना कळले. त्यांनी रजिस्ट्रीची डुप्लिकेट कॉपी मिळवली असता त्यावर जैन यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो लावला होता आणि स्वाक्षरीही भलत्याच व्यक्तीने केल्याचे त्यांना दिसले. आपण जमिनमालक असताना दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन संतोष आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या नावे करून घेतल्याचे जैन यांच्या लक्षात आले. किमान दोन कोटी रुपयांची ही जमीन संतोषने अशा पद्धतीने हडपण्याचे कटकारस्थान रचल्यामुळे जैन यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. महिनाभरापूर्वीपासून पोलिसांनी या तक्रारीची चौकशी केली आणि अखेर शुक्रवारी या प्रकरणात नवीन कामठी ठाण्यात गुन्हा दाखल केला.गुन्हे दाखल होण्याची मालिकागेल्या तीन दशकांपासून गुन्हेगारीत सक्रिय असलेला आणि अनेकांचे जगणे मुश्किल करून सोडणाऱ्या आंबेकर आणि टोळीविरुद्ध १२ ऑक्टोबर २०१९ ला पहिल्यांदा सीताबर्डी ठाण्यात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. त्यानंतर केलेल्या कडक कारवाईमुळे पीडितांची हिंमत वाढली आणि आंबेकरविरुद्ध सोनेगाव, तहसील, लकडगंज ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. तक्रार आणि गुन्हे नोंदविण्याची ही मालिका पोलिसांकडून पहिल्यांदाच एवढी भक्कम कारवाई झाल्यामुळे सुरू झाली. संतोष आणि साथीदारांच्या जाचाला कंटाळलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
कुख्यात आंबेकरने हडपली कोट्यवधींची जमिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:56 AM
कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर आणि टोळीविरुद्ध नवीन कामठी ठाण्यातही शुक्रवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला. विकास जैन नामक व्यापाऱ्याची सुमारे दोन कोटींची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देबनावट कागदपत्र, कटकारस्थान : नवीन कामठीत गुन्हा दाखल