लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला मारहाण करून पाच हजाराची खंडणी वसूल करण्याच्या आरोपात अटक केल्यानंतर पोलिसांवर मारहाणीचा आरोप लावणारा कुख्यात गुन्हेगार बाल्या ऊर्फ संदीप माने (रा. शनिवारी, गुजरवाडी गणेशपेठ) याला गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी पुन्हा अटक केली. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील खंडणीची रक्कम मिळवण्याचे आहे आणि त्याच्या अन्य साथीदारांनाही अटक करायची आहे, असे मुद्दे मांडून पोलिसांनी न्यायालयातून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला.मॉडेल मिल चाळीत राहणारे नितीन नत्थूजी नगराळे (वय ४२) यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी २१ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनुसार, नगराळेंचे गणेशपेठमधील जाधव चौकात श्री साई टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स नावाने कार्यालय आहे. १० डिसेंबरच्या दुपारी २ ते २.३० च्या सुमारास कुख्यात बाल्या माने त्याच्या नऊ साथीदारांसह नगराळे यांच्या कार्यालयात येऊन नगराळेसमोर खुर्चीवर बसला. काय काम आहे, असे विचारले असता, बाल्या माने को पहचानता नहीं क्या, असे तो म्हणाला. नगराळेने ओळखत नसल्याचे म्हणताच, बाल्या आणि त्याच्या साथीदारांनी नगराळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी बाल्या व त्याच्या गुंड साथीदारांना तेथून हाकलून लावले. यावेळी बाल्याने धंदा करायचा असेल तर पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जीवे ठार मारेन, असे म्हटल्याचे नगराळेंनी तक्रारीत म्हटले आहे. धमकीला घाबरून बाल्याला पाच हजार रुपये दिल्यानंतर ही रक्कम हिसकावून बाल्या आणि त्याचे साथीदार पळून गेल्याचेही तक्रारीत नगराळेने नमूद केले आहे. जीवाच्या धाकामुळे नगराळे बरेच दिवस गप्प बसले, नंतर २० डिसेंबरला त्यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्याची माहिती कळताच वरिष्ठांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, गणेशपेठ पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी बाल्याला शनिवारी रात्री अटक केली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले.पोलिसांसोबत शह आणि मातचा खेळ !पोलीस त्याचा पीसीआर मिळवण्याच्या तयारीत असताना बाल्याने पोलिसांवरच मारहाणीचा आरोप लावला. त्यामुळे न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडीऐवजी न्यायालयीन कस्टडीत (कारागृहात) पाठविण्याचे आदेश दिले. बाल्याने पोलिसांच्या कस्टडीतून निसटून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केल्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी त्याच रात्री प्रतीक वामन लांबट (वय २८) तसेच विलास गजानन बांबलवार (वय २६, रा. गुजरवाडी गणेशपेठ) या दोघांना अटक केली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्यांनाही न्यायालयीन कस्टडीत पाठविण्यात आले. दरम्यान, मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे पोलिसांनी बाल्याला कारागृहातून ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. बाल्याकडून अनेक गुन्ह्याची उकल होऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरातील कुख्यात बाल्या मानेला पुन्हा अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:56 PM
ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला मारहाण करून पाच हजाराची खंडणी वसूल करण्याच्या आरोपात अटक केल्यानंतर पोलिसांवर मारहाणीचा आरोप लावणारा कुख्यात गुन्हेगार बाल्या ऊर्फ संदीप माने (रा. शनिवारी, गुजरवाडी गणेशपेठ) याला गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी पुन्हा अटक केली.
ठळक मुद्देकारागृहातून घेतले ताब्यातव्यावसायिकाला मारहाण करून खंडणी उकळल्याचा आरोपगणेशपेठ पोलिसांनी तीन दिवसात दुसऱ्यांदा केली अटक