नागपूर - मोमिनपुऱ्यातील कुख्यात गुंड छोटा इब्राहिम ऊर्फ छोटा नबी खान याची गुंडांच्या एका टोळीने अपहरण करून हत्या केली. त्याचा मृतदेह कन्हान नदीत फेकला. शनिवारी दुपारी हा प्रकार उघड झाल्यामुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा इब्राहिम ऊर्फ नबी खान छोटा इब्राहिम म्हणून कुख्यात होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामाऱ्या, हल्ला, लुटमार, गैरकायद्याची मंडळी जमविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करून त्याला कारागृहातही डांबले होते. काही महिन्यांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर परत गुन्हेगारीत सक्रिय झाला होता.
यशोधरानगरातील गुंड राशिद खान याच्यासोबत काही दिवसांपासून त्याचे वैमनस्य टोकाला पोहचले होते. दोघांनी एकमेकांना ‘टपका दूंगा’ अशी धमकीही दिली होती. या पार्श्वभूमीवर, यशोधरानगर आणि म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या तीन ते चार गुंडांनी गुरुवारी छोटा इब्राहिमला मोमिनपुऱ्यातून अपहरण करून यशोधरानगरातील विटाभट्टी चाैकात नेले. तेथे त्याच्यावर शस्त्राचे घाव घालून गंभीर जखमी करण्यात आले. नंतर एका वाहनात टाकून आरोपी त्याला कन्हानमध्ये घेऊन गेले आणि नदीत फेकून दिले.
बुधवारी रात्री शेवटचा दिसला
इब्राहिमविरुद्ध तहसील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ३९९ (गैरकायद्याची मंडळी जमविणे)कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात तो फरार होता. मात्र, त्याचे वस्तीत नेहमीच जाणे-येणे होते, अशी चर्चा आहे. बुधवारी रात्री त्याला वस्तीतील लोकांनी बघितले. नंतर तो गायब झाला. गुंडवृत्तीचा असल्याने त्याची कुणी दखल घेण्याचा प्रश्न नव्हता. शनिवारी दुपारी इब्राहिमचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी चाैकशीला गती दिली. नंतर राशिद, सोनू तसेच शम्मीची नावे पुढे आली. हत्या करण्याच्या उद्देशानेच आरोपींनी इब्राहिमचे अपहरण केल्याचा घटनाक्रमही पोलिसांना कळला. रात्रीपर्यंत या प्रकरणाचे बरेचसे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते.
अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत
इब्राहिम अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. त्याने मोमिनपुऱ्यातील बकरामंडीत एकाची हत्या केली होती. उंचीने बुटका असल्याने त्याला छोटा इब्राहिम असे टोपणनाव पडले होते. तो अत्यंत आक्रमक होता. छोट्या छोट्या कारणावरून कुणावरही हल्ला करत होता. घातक शस्त्रही त्याच्याजवळ राहायचे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी त्याच्यासोबतच काही दिवसांपूर्वी उठतबसत होते. इब्राहिमच्या शीघ्रकोपी स्वभावामुळेच त्यांच्यासोबत त्याचे वैर निर्माण झाले होते, अशी माहिती आहे.