ठाणे : कल्याणमधील एका वाईन शॉप चालकाला ५० लाखांच्या खंडणीप्रकरणी ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याला ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी राजेश तांबे यांनी २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. पुजारीविरुद्ध खंडणी आणि हत्येच्या धमकीचा गुन्हा महात्मा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
कल्याण पश्चिमेकडील या मद्यविक्रेत्याला जुलै २०२१ मध्ये पुजारी याने ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. याशिवाय, त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यांमध्येही खंडणीचे गुन्हे नोंद आहेत. त्याने अनेक व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, डान्स बारचालक, हॉटेलचालक आणि दारूविक्रेते यांना धमकावल्याचा आरोप आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या ५० लाखांच्या खंडणीचा तपास आता मुंबई एटीएसकडे सोपविण्यात आला आहे. पुजारीला फिलिपिन्समधून भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा मुंबई एटीएसने दिल्ली विमानतळावरून घेतला.
ठाणे न्यायालयात त्याला बुधवारी हजर केल्यानंतर एटीएसच्या पथकाने दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य, त्याची दहशत लक्षात घेऊन यातील सखोल तपासासाठी थेट दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.