येरवडा - मेढा पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलेला कुख्यात गुंड गजानन मारणे याला येरवडा कारागृहात आज सकाळी स्थानबद्ध करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणले.
गजानन मारणेच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे पाठवला होता. देशमुख यांनी प्रस्ताव २ मार्चला मंजूर केला होता. तेव्हापासून ग्रामीण पोलीस दलाची तीन पथके मारणे याचा शोध घेत होती. कोल्हापूर, सातारा भागात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक दोडगे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके त्याचा शोध घेत होती. दोन दिवसांपूर्वी तो कोल्हापूरला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथके तिकडे गेली होती. पण तो पोलिसांना गुंगारा देऊन साताऱ्यात पळून आला होता. त्यानंतर सातारा पोलिसांच्या मदतीने जावळी तालुक्यातील मेढा येथे शनिवारी सायंकाळी गजानन मारणे याला पकडण्यात आले. त्याचबरोबर आणखी ३ साथीदार होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई साठी त्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला आहे. त्यातच गजानन मारणे याला करण्यात आलेली अटक त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांना धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.