मुंबई - कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील विशेष MCOCA कोर्टाचे निर्देश दिले आहेत. सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून ताब्यात घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) भारतात आणलं असून सुरेश पुजारीवर मुंबई आणि कर्नाटकामध्ये खंडणी वसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) चौकशीनंतर गँगस्टर सुरेश पुजारीचा गुन्हे शाखेने ताबा घेतला आहे. शुक्रवारी त्याला प्रॉडक्शन वाॅरंटवरून ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मुंबईत त्याच्याविरोधात १७ गुन्हे नोंद असून त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.पुजारीविरोधात मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि कर्नाटक या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. फिलिपिन्समध्ये प्रेयसीसोबत बनावट नावाने राहणाऱ्या सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबर २०२१ राेजी तेथील पोलिसांनी अटक केली होती. पुढे एटीएसच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला आहे. शुक्रवारी त्याला अटक करीत, न्यायालयात हजर केले.उल्हासनगर परिसरात कुटुंबासोबत राहण्यास असलेल्या व्यावसायिकाचे फोर्ट परिसरात कॅमेऱ्याचे दुकान आहे. त्याच्या व्यवसायावर नजर पडलेल्या सुरेश पुजारी टोळीने ६ जानेवारी २०१८ पासून ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान अशा प्रकारेच खंडणी न देणाऱ्या ठाण्याच्या भिवंडी परिसरातील हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलवर १० जानेवारीला दुपारी चारच्या सुमारास पुजारीने तीन शूटर्सच्या मदतीने गोळीबार घडवून आणला. त्यानंतर पुजारीने फोर्टमधील व्यावसायिकाला अशा प्रकारेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी सुरू केली हाेती. खंडणीच्या तक्रारीच्या आधारे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सहाजणांना अटक केली. मोक्काअन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये पुजारी पाहिजे असलेला आरोपी होता. त्यानुसार गुन्हे शाखेने प्रॉडक्शन वाॅरंटवरून ताब्यात घेत त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे.