लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५ मार्चच्या रात्री बंगाली पंजा भागात प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडावर फायरिंग करून १५ ते २० गाड्यांची तोडफोड करणारा कुख्यात गुंड वसीम चिऱ्या याला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.कुख्यात वसीम चिऱ्याच्या तहसील पोलिसांनी २२ मार्चच्या सकाळी मुसक्या बांधल्या होत्या. त्याच्याकडून माऊझर आणि दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.दोन डझन गंभीर गुन्हे दाखल असलेला लकडगंज-शांतिनगरचा कुख्यात गुंड वसीम चिºया तसेच त्याचे साथीदार दानिश आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आवेश यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्वाचा वाद सुरू आहे. ते एकमेकांवर नेहमीच दात खाऊन राहतात. या पार्श्वभूमीवर, १५ मार्चला रात्री त्यांच्यात वादाचा भडका उडाला. वसीमच्या टोळीतील मोहसीन अकोला हा आवेश आणि त्याच्या साथीदारांना सापडला. त्यांनी मोहसीनला बेदम मारहाण केली होती. कसाबसा जीव वाचवून तेथून पळ काढल्यानंतर त्याने वसीम चिºया आणि दानिशला माहिती दिली. त्यामुळे हे दोघेही २० ते २५ साथीदारांसह बंगाली पंजा भागात पोहचले. वसीमने आवेशच्या नातेवाईकावर ५ फायर (गोळ्या झाडल्या) केले तर, परिसरात उभे असलेल्या १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलचे ठाणेदार मालवीय यांची बदली केली तर त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे जयेश भांडारकर यांना तहसीलमध्ये पाठविले. भांडारकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी मोहसीनच्या मुसक्या बांधल्या तर, रविवारी सकाळी कुख्यात वसीमला जेरबंद केले. त्याला अटक करून सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. फायरिंग तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची वसीमकडून माहिती घ्यायची असल्याने त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे तहसील पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, न्यायालयाने वसीमला २६ मार्चपर्यंत पीसीआर मंजूर केला.डोबीनगरमध्ये होता दडूनकुख्यात वसीम डोबीनगरात दडून होता. त्याला त्याचा जावेद नामक साथीदार खाण्यापिण्याच्या चीजवस्तू आणि आवश्यक साहित्य पुरवीत होता. ही माहिती कळताच ठाणेदार भांडारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी भल्या सकाळी वसीमच्या ठिकाणावर धडक देऊन त्याच्या मुसक्या बांधल्या. २२ गुन्हे दाखल, तरीही होता मोकाट२००२ पासून गुन्हेगारीत सक्रिय असलेला वसीम चिºया शांतिनगरात राहतो. तो शहरातील एक खतरनाक गुन्हेगार मानला जातो. त्याच्याकडे नेहमीच पिस्तूल असते. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण अशासारखे एकट्या लकडगंज पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षांपूर्वी वसीम आणि त्याचा प्रतिस्पर्धी गुंड तिरुपती या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी दोघांनी त्यांच्या गुंड साथीदारांसह एकमेकांवर तब्बल अर्धा तास फायरिंग केली होती. सध्या वसीमसोबत आवेशचे वाकडे आले आहे. त्यामुळे त्याचा गेम करण्याच्या उद्देशानेच त्याने १५ मार्चला फायरिंग आणि तोडफोड केली आणि फरार झाला. मात्र, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात तहसीलचे पोलीस निरीक्षक सागर आणि त्यांच्या सहकाºयांनी ही कामगिरी बजावली.
नागपूरच्या बंगाली पंजातील फायरिंग, तोडफोड : कुख्यात वसीम चिऱ्याला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:18 PM
१५ मार्चच्या रात्री बंगाली पंजा भागात प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडावर फायरिंग करून १५ ते २० गाड्यांची तोडफोड करणारा कुख्यात गुंड वसीम चिऱ्या याला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ठळक मुद्देआठ दिवसांपासून होता फरार : तहसील पोलिसांनी बांधल्या मुसक्या : अनेक गुन्ह्यांचा होणार उलगडा