नवी दिल्ली : पोलिसांकडे कोणत्याही तक्रारीसाठी अनेकवेळा पोलीस स्टेशनला जावे लागते, मात्र दिल्लीत राहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दिल्लीतील लोक चोरीचा एफआयआर घरबसल्या ऑनलाइन नोंदवू शकणार आहेत. एवढेच नाही तर तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी तक्रारदाराशी संपर्क साधतील. बीट आणि उपविभागाचे अधिकारीही 24 तासांत पीडित व्यक्तीपर्यंत पोहोचून घटनास्थळी भेट देतील.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Delhi Police Commissioner Rakesh Asthana) यांनी प्रजासत्ताक दिनी ई-एफआयआर अॅप लाँच केले, ज्याद्वारे लोक चोरीसारख्या घटनांबाबत तत्काळ तक्रारी नोंदवू शकतील. यावेळी राकेश अस्थाना म्हणाले की, 'ई-एफआयआर' अॅपवर मालमत्तेच्या चोरीसाठी ऑनलाइन एफआयआर नोंदवल्यास पोलिसांना अशा प्रकरणांचा त्वरीत तपास करण्यात मदत होईल.
याचबरोबर, राकेश अस्थाना म्हणाले, "दिल्लीतील चोरीच्या मालमत्तेसाठी वेब सुविधेद्वारे एफआयआरची तात्काळ नोंदणी केल्याने तपास अधिकार्यांना तपास आणि कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यात आणि प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यात मदत होईल, ज्यामुळे पोलीस स्टेशन्स आणि न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत होईल." तसेच, 'हजारो लोकांना या उपक्रमाचा फायदा होणार असून एकीकडे त्यांना पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही तर दुसरीकडे जनतेचा पोलिसांवरील विश्वासही वाढेल', असे राकेश अस्थाना म्हणाले.
दरम्यान, ई-एफआयआर अॅपद्वारे घरातील चोरीसंदर्भात ऑनलाइन एफआयआर नोंदवण्यासाठी तीन अटी असतील. तक्रार दाखल करण्यासाठी, गुन्हा दिल्लीच्या परिसरात असणे आवश्यक आहे आणि आरोपी ओळखीचा नसावा. याशिवाय या घटनेत कोणालाही रंगेहाथ पकडण्यात आलेले नाही आणि कोणीही जखमी झाले नाही पाहिजे.
दिल्ली पोलिसांच्या वेबसाइटवरही तक्रार नोंदवू शकताई-एफआयआर अॅप व्यतिरिक्त, तुम्ही दिल्ली पोलिसांच्या वेबसाइटवर देखील एफआयआर नोंदवू शकता. यासाठी लोकांना दिल्ली पोलिसांच्या वेबसाइटवर जाऊन तेथील नागरिक सेवावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तेथे घरफोडीचा एफआयआर नोंदविला जाऊ शकतो.