मुंबई - २६/11 सारख्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी मुंबई पोलीस दलातील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात (बीडीडीएस) तीन अत्याधुनिक रोबो दाखल झाले आहेत. त्यामुळे बीडीडीएस पथकात आधुनिकीकरणामुळे बॉम्ब शोधताना होणारी मनुष्यहानीला छाप बसू शकणार आहे. बॉम्ब शोधून तो निष्क्रीय करणारा आधुनिक पद्धतीने तयार केलेला रोबोट दाखल करण्यात आले आहेत. मिनी रिमोटली ऑपरेटेड व्हेहिकल (एमआरओवी) असं या रोबोचं नाव असून त्याची किंमत ८४ लाख इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांकडून या रोबोटची मागणी करण्यात येत होती. हा रोबोट भारतातच बनवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात मुंबईची खूप मोठी हानी झाली. यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी विशेषतः लोकल ट्रेन्समध्ये आरडीएक्स बॉम्ब पेरले होते. अशा प्रसंगी पुढील धोका टाळण्यासाठी बॉम्ब निष्क्रीय करण्याकरीत बीडीडीएस पथक घटनास्थळी धाव घेते. यात मनुष्यहानी होण्याची मोठी शक्यता असते. मात्र, आता या रोबोटमुळे मुंबई पोलिसांची ताकद अधिक वाढली आहे. महत्वाचं म्हणजे हा रोबो पावसाळ्यात देखील आपली भूमिका बजावणारा आहे.
भारतात तयार झालेल्या या रोबोटची किंमत जवळपास ८४ लाख रुपये इतकी असून या यंत्राचे वजन साधारण १०० किलोच्या आसपास आहे. पावसाळ्यातही अगदी योग्य पद्धतीने हा रोबोट काम करण्याच्या क्षमतेचा आहे. ४५ डिग्रीमध्ये उंच पर्वत, विमानाच्या शिड्या, रेल्वे स्थानकाच्या शिड्या अगदी सहज चढू शकणार आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हा रोबोट रिमोटच्या सहाय्याने चालणार असून बॉम्ब निष्क्रीय करताना मानवहानी होणार नाही, हे या रोबोट आणण्यामागे मुख्य उद्दीष्ट आहे.