शाहजहांपूर – उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर इथं २०१६ मध्ये NRI पतीच्या हत्या प्रकरणात कोर्टाने निकाल सुनावत आरोपी पत्नीला फाशीची शिक्षा दिली आहे. त्याचसोबत महिलेच्या प्रियकराला आजीवन कारावासात पाठवलं आहे. ही पत्नी पतीला घेऊन परदेशातून मायदेशी परतली होती. इथं येऊन तिने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. महिला आणि तिच्या प्रियकराने घरातील २ पाळीव श्वानांनाही विष देऊन मारून टाकले होते.
ही घटना आहे १ सप्टेंबर २०१६ ची, बसंतापूर गावच्या बाहेर असलेल्या एका फार्म हाऊसवर एनआरआय सुखजित सिंगचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्याशिवाय घरातील २ पाळीव श्वानांनाही विष देऊन मारले होते. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी मनदीप कौर आणि प्रियकर गुरप्रित बिट्टूला अटक केली होती. मृत व्यक्ती, पत्नी आणि तिचा प्रियकर हे तिघेही ब्रिटनचे नागरिक होते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा मनदीप कौर आणि गुरप्रितचे ब्रिटनपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे पत्नीने पतीचा काटा काढण्याचे ठरवले. एका षडयंत्रातंर्गत पत्नीने पतीला घेऊन भारत गाठले आणि प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली.
कोर्टात सुरू असलेल्या दिर्घकालीन सुनावणीनंतर सत्र न्यायालयाचे न्या. पंकज कुमार श्रीवास्तव यांनी आरोपी एनआरआय पत्नी मनदीप कौरला फाशी आणि तिच्या प्रियकराला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालाने मृत सुखजितच्या कुटुंबाने कोर्टाचे आभार मानले. या प्रकरणी सरकारी वकील श्रीपाल म्हणाले की, एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली होती. कोर्टाने हे प्रकरण गंभीर असल्याचे मानले. या दोघांना ५ ऑक्टोबर २०२३ रोजी दोषी ठरवले गेले. त्यानंतर दोघांनाही कोर्टाने आज शिक्षा सुनावली.