मीरारोड - कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांनी वादग्रस्त ठरलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील कोविड उपचार केंद्रात आणखी एका खळबळजनक घटना घडली आहे. परिचारिकेचे लपून विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ काढून तिला धमकावल्या प्रकरणी ओमप्रकाश पांडे या कंत्राटी कर्मचाऱ्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मात्र पसार झाला आहे. पालिकेच्या आस्थापनेतच महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा समोर आले आहे.
महापालिकेने गेल्या वर्षी कोरोना संर्ग सुरु झाल्यानंतर न्यू गोल्डन नेस्ट जवळील एमएमआरडीए इमारतीत कोविड अलगीकरण व उपचार केंद्र सुरु केले आहे. याचा कोरोना संसर्ग काळात नागरिकांना चांगला उपयोग झाला तेवढेच सदर केंद्र गंभीर घटनांनी वादात राहिले आहे. एका कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याने उपचारासाठी दाखल महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडून गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून मोठी टीकेची झोड महापालिकेवर उठली. त्यानंतर या ठिकाणी कंत्राटी सफाई कर्मचारी यांना अमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली.
अमली पदार्थ येथे ठेवण्यात आले होते. नुकतेच पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खंबीर यांच्यावर गोळीबार प्रकरणातील आरोपी ठेकेदार जेवण बनवण्याचे कंत्राट घेणारा तर अन्य आरोपी कर्मचारी म्हणून येथे असायचे. इतक्या गंभीर घटना घडून देखील महापालिका आणि नगरसेवकांनी ठेकेदारांची कंत्राटे रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची तसेच कार्यकर्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी आदी कार्यवाही करण्याकडे गांभीर्य दाखवले नाही. त्यातच येथील परिचारिकेच्या फिर्यादी वरून १४ ऑक्टोबर रोजी नवघर पोलीस ठाण्यात कंत्राटी कर्मचारी पांडे विरुद्ध विनयभंग आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक पांडे हा मेसर्स सिटीजन अलाईड प्रा. लि. या ठेकेदार कंपनीचा हाऊसकिपिंग काम करण्यासाठी कंत्राटी सुपरवाईजर आहे . परंतु ठेकेदाराचे काम सध्या येथे सुरू नसताना तो बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होता. त्याच्या खोलीलगतच पालिकेत कंत्राटी काम करणारी परिचारिका राहत होती खोलीच्या बाहेरच्या बाजूस हवा खेळती राहावी म्हणून असलेल्या जागेतून पांडे हा त्याच्या मोबाईलमध्ये परिचारिका कपडे बदलत असतानाचे चित्रीकरण करायचा.
परिचारिकेला १३ ऑक्टोबर रोजी रात्री आपले चित्रीकरण केले जात असल्याचे लक्षात येताच तिने पांडेचा मोबाईल घेत त्याच्या दाराची काडी लावून त्याला कोंडून ठेवले होते . त्याचा मोबाईलची तपासणी केली असता तिला तिच्या व्हिडीओ क्लिप सापडल्या. पांडेने तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मात्र पळून गेला आहे. सदर घटनेची माहिती कोणास कळू नये म्हणून प्रशासना कडून खास काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.