मुंबई - मुंबईतील नायर रुग्णालयातून काल चोरीला गेलेलं बाळ अवघ्या ७ तासांत पोलिसांना सापडलं आहे. आता हे बाळ पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावलं आहे. काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास हे बाळ एका महिलेने पळवून नेलं होतं. ही महिला बाळ चोरून पळत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी बाळाच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमं आणि सोशल वायरलमुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, सतर्क नर्स आणि सोशल वायरलमुळे पोलिसांच्या तपासाला यश आलं आणि ७ तासांत बाळ आईच्या कुशीत विसावलं. अटक महिला हेजल कोरिआ हिला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली असून चौकशीत तिने तिचे दुसरे लग्न झाले होते. मुलं होत नव्हतं म्हणून हे बाळ चोरल्याचं तिने पोलिसांनी सांगितले.
हेजल कोरिआ ही महिला नालासोपाऱ्याची रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. हेजलने नायर रुग्णालयातून दहिसरच्या रहिवासी असलेल्या शीतल साळवी यांचं बाळ काल पळवून नेलं होतं. हेजलने बाळ चोरल्यानंतर थोड्यावेळाने त्या बाळाने रडायला सुरुवात केली. यामुळे गोंधळलेली हेजल वाकोल्यातील एका रुग्णालयात गेली होती. रुग्णालयातील नर्सने हेजलला प्रसुती कुठे झाली असा प्रश्न विचारला. त्यावर तिने घरीच प्रसूती झाल्याचं सांगितलं. मात्र, सतर्क नर्स आणि डॉक्टर तिच्यावर शंका यायला सुरुवात झाली. नर्स आणि डॉक्टरांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना याबाबत माहिती दिली. तसेच नायर रुग्णालयातील सीसीटीव्ही दृश्य तोपर्यंत व्हायरल झाल्याने या नायर रुग्णालयाला संपर्क साधून त्यांच्याकडून बाळ चोरीला गेलं आहे का याची विचारणा केली असता रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. नंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने बाळ चोरल्याचं कबूल केलं. आग्रीपाडा पोलिसांनी अटक महिलेविरोधात भा. दं. वि. कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.