नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका नर्सने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. "तो माझी बदनामी करू पाहतोय म्हणूनच मी जीव देतेय" असं तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कानपूरच्या कल्याणपूरमध्ये एका नर्सने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एक तरुण नर्सला तिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, एक 20 वर्षीय तरुणी इटावा परिसरात राहत होती. अनुराग रुग्णालयात ती नर्स म्हणून काम करायची. तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असून आपल्या सुसाईड नोटमध्ये मृदुल माझी बदनामी करू पाहतोय आणि म्हणूनच मी जीव देत असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सुसाईड नोटमध्ये मंधना येथे राहणाऱ्या मृदुल त्रिपाठी सोबत नर्सची ओळख होती. त्यामुळेच मृदुलने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ एडीट केले असल्याची माहिती मिळाली.
आरोपी मृदुल विरोधात गुन्हा दाखल
मृदुल हेच फोटो दाखवून नर्सला ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सतत धमकी देत असायचा. यामुळेच तरुणी नैराश्येत गेली होती. आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय समोर नसल्याचं नर्सने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. एसीपी कल्याणपूर दिनेश कुमार शुक्ला यांनी आरोपी मृदुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.