लोणी काळभोर : रूग्णालयात नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाख ५० हजार रुपयांना एका नर्सने गंडा घातला आहे. या नर्स विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुक प्रकरणी कैलास दौलत सावंत ( वय ३२, रा. थेऊर, चव्हाणवस्ती, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. सिमा मुक्ताजी नितनौरे (रा. श्रीराम निवास, कोलवडी, ता. हवेली ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी नर्सचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही ५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडलेली आहे. कैलास सावंत यांच्या आई चतुराबाई आजारी असल्याने कोलवडी येथील साक्षी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. या ठिकाणी सिमा नितनौरे या नर्स म्हणून काम करतात. या दोघींची ओळख झाली होती. एके दिवशी चतुराबाई यांनी माझ्या मुलास नोकरी मिळत नाही असे सांगितले. यांवर सिमा हिने मी तुमच्या मुलाला रूग्णालयात नोकरीला लावते. त्यासाठी खर्च म्हणून साडेतीन लाख रुपये लागतील असे सांगितले. मुलाला नोकरी लागत आहे हे पाहून चतुराबाई यांनी ५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी ३ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर चतुराबाई यांचा मुलगा कैलास याने आपल्या भावास काम लागावे म्हणून वारंवार पाठपुरावा केला. परंतु, नितनौरे यांनी दाद दिली नाही. नोकरीस लावत नाही म्हणून कैलास यांनी पैशांची मागणी केली. वारंवार पैश्यांची मागणी होत आहे हे पाहून सिमा नितनौरे हिने एक लाख व दुसरा अडीच लाखांचा असे दोन धनादेश दिले. व ते वटतील अशी हमी दिली. सावंत यांनी ते दोन्ही धनादेश बॅक आॅफ इंडिया थेऊर शाखेत वटवणेसाठी जमा केले असता नितनौरे यांचे खाते बंद केल्याच्या शे-यासह परत आले. त्यामुळे फिर्यादीने फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले हे करत आहेत.