कोलकातामधील निर्भयासारखी घटना उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधून समोर आली आहे. एका नर्सवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ३० जुलैपासून नर्स बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. नर्सच्या बहिणीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचा खुलासा करताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.
बेपत्ता महिलेचा मृतदेह ८ ऑगस्ट रोजी बिलासपूर जिल्ह्यात झुडपात विचित्र अवस्थेत सापडला होता. बलात्कारानंतर महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आणि जवळपास बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असताना पोलिसांना एक संशयित तरुण दिसला जो तिचा पाठलाग करताना दिसत होता.
फोनचं लोकेशन यूपीमधील बरेली येथील असल्याचे पोलिसांच्या टीमला समजलं. लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा असं आढळून आलं की हा फोन धर्मेंद्रची पत्नी खुशबू वापरत आहे. तिचा पती धर्मेंद्र हाही फोन वापरत असल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं. दोघेही घटनास्थळावरून फरार झाल्याचं आढळून आलं, त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक टीम तैनात केली आणि फोनचं लोकेशन पाहत राहिले.
तपासादरम्यान पोलिसांना धर्मेंद्रचं राजस्थानमधील जोधपूर येथील ठिकाण सापडलं. पोलिसांच्या पथकाने त्याला मंगळवारी पकडून डेहराडूनला आणून चौकशी केली असता, तो गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जाफरपूर येथील एका कारखान्यात काम करत असल्याचं पोलिसांना सांगितलं. ३० जुलै रोजी त्याला एक महिला निर्जनस्थळी अंधारात एकटी फिरताना दिसली. त्याने तिची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिलेने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिची गळा दाबून हत्या केली.
महिलेचा फोन हिसकावून घेतल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा दगडाने ठेचला. बरेलीला जाऊन तिच्या फोनमध्ये स्वत:च सिम टाकलं आणि तो वापरू लागला. पोलिसांना याची माहिती मिळताच तो जोधपूरला पळून गेला. याप्रकरणी एसएसपी मंजुनाथ टीसी यांनी सांगितलं की, आरोपीला जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी धर्मेंद्र याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.