मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सोमवारी रात्री मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. हमीदिया हॉस्पिटलच्या कमला नेहरू इमारतीतील शिशू विभागामध्ये आग लागली. यामध्ये 4 बालकांचा होरपळून मृत्यू झाला तर 36 बालकांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही घटना खूप वेदनादाई असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये कोरोना वॉर्डला आग लागली होती. यामध्ये 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या आधी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातीलच लहान मुलांच्या विभागाला आग लागली होती. देशभरातही गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत गेल्या दीड वर्षांत हॉस्पिटलना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
शिवराज सिंह यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करताना सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या घटनेची चौकशी आरोग्य आणि शल्य चिकित्सक विभागाचे एसीएस मोहम्मद सुलेमान करणार आहेत. मंत्री विश्वास सारंग देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. मृतांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांनी 4-4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
कुठे लागली आग...इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. या ठिकाणी आयसीयू देखील आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या पोहोच्या होत्या. मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मुलांचा जीव वाचवायचा सोडून हॉस्पिटलचा स्टाफ तिथून पळून गेला. सर्वत्र धुराचे वातावरण होते.