नवी दिल्ली : नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद शहरात घडली आहे. येथे सायबर गुन्हेगारांनी विद्यार्थिनीकडून 16 लाख रुपये लुटल्याची घटना घडली. वडिलांच्या अकाउंटमधून काढलेले दोन लाख रुपये परत करण्यासाठी विद्यार्थिनीने किडनी विकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा सर्व प्रकार घडला. नर्सिंगची विद्यार्थिनी मूळची गुंटूरची आहे. स्पंदन कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनीने याबाबत पोलिसांना माहिती देऊन मदत मागितली.
TOI च्या रिपोर्टनुसार, विद्यार्थिनी अलीकडेच नर्सिंग कोर्स करण्यासाठी हैदराबादला गेली होती. त्यानंतर, तिने तिच्या वडिलांच्या UPI अकाउंटद्वारे घड्याळ, कपडे आणि इतर वस्तू ऑनलाइन ऑर्डर केल्या. यानंतर विद्यार्थिनीने वडिलांच्या लक्षात येण्यापूर्वीच हे पैसे परत जमा करण्याचा विचार केला. पण तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने किडनी विकून पैसे कमवण्याचा ऑनलाइन मार्ग शोधला.
नोंदवलेल्या तक्रारीनुसार, विद्यार्थिनीने ऑनलाइन जाहिरात पाहिली, ज्यामध्ये किडनीची तातडीची गरज असून डोनरला 7 कोटी रुपये दिले जातील, असे लिहिले होते. यावर विद्यार्थिनीने डॉ. प्रवीण राज नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर या व्यक्तीने विद्यार्थिनीला सांगितले की, तिला सुरुवातीला 3.5 कोटी रुपये दिले जातील आणि उर्वरित पैसे नंतर दिले जातील.
एवढेच नाही तर आरोपीने विद्यार्थिनीला तिचा वैद्यकीय अहवालही विचारला आणि ती किडनी दानासाठी पात्र असल्याचे सांगितले. यानंतर फसवणुकीचा खरा खेळ सुरू झाला. या आरोपीने विद्यार्थिनीकडून कर आणि पोलीस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली 16 लाख रुपयांची मागणी केली आणि विद्यार्थिनीने ही रक्कम दिली. पण, विद्यार्थिनीने तिच्याकडे पैसे मागितल्यावर आरोपीने विद्यार्थिनीला पैसे घेण्यासाठी दिल्लीला जाण्यास सांगितले. विद्यार्थिनी तेथे पोहोचली असता पत्ता बनावट असल्याचे तिला आढळले.
वडिलांच्या एटीएमद्वारे काढले पैसेदरम्यान, विद्यार्थिनीने तिच्या वडिलांच्या बँक अकाउंटमधून 16 लाख रुपये काढले होते. विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे एक एटीएम त्यांच्या मुलीला दिले होते. यातून नोव्हेंबरमध्ये रोख रक्कम काढण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी आपल्या मुलीला घरी येण्यास सांगितले होते, मात्र ती वसतिगृहातून दुसरीकडे गेली होती. याबाबत वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा विद्यार्थिनी आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील जगगय्यापेटा येथे मित्राच्या घरी सापडली.