पनवेल - कामोठे परिसरातून नगरसेविकेलाच लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या नगरसेविकेच्या ना कुसुम रवींद्र म्हात्रे असं आहे. पायी चालत घरी जात असताना म्हात्रे यांना अज्ञात इसमाने ओ नगरसेवक म्हणून हाक दिली. त्यानंतर त्या थांबल्या आणि बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या अंगावरील दागिने लुटले आणि पसार झाले. कुसुम म्हात्रे या नगरसेविका तसेच महिला बाळ कल्याण समितीच्या सभापती आहेत. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेत आहेत. कुसुम म्हात्रे या आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या खासगी गाडीने कामोठे वसाहती जवळील महामार्गावर उतरल्या. यावेळी त्यांच्यासोबत ५ ते ७ महिला कार्यकर्त्या देखील होत्या. कमोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्याच्या सोबतच्या महिला या पायी चालत आपल्या घरी परतत होत्या. दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याचे ऐवज लुटला. यावेळी वेळी म्हात्रे यांनी आरडाओरड केली. चोरटा सोन्याचे गंठण आणि सोनसाखळी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटना घडल्यानंतर नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी थेट कामोठे पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अधिक तपास कामोठे पोलीस घेत आहे.