मुंबई - आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरीने देश विदेशात अनेक किताब मिळवणाऱ्या सुहास खामकर यांच्या नावाचा गैरफायदा घेत महिला मुलींना फसवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात सुहास खामकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
प्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांचे देश विदेशात अनेक चाहते आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत जे सुहास खामकर यांना फॉलो करतात. याचाच गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचे शोधलं मीडियावर बनावट अकाउंट तयार करून महिला मुलींशी अश्लील संवाद साधत आहेत. अनेकदा तर त्यांना सुहास खामकर बोलतोय अश्या प्रकारचा फोन ही केला जातो आणि त्यांच्याशी नको त्या आक्षेपार्ह विषयी बोलले जाते. या प्रकारामुळे सुहास खामकर यांची बदनामी होत आहे. याबाबत खबरदारी म्हणून आणि अज्ञाताविरोधात खामकर यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच याबाबत सायबर कक्षाद्वारे ही चौकशी होणार आहे. सुहास खामकर नावाने जी अकाऊंट आहेत ती व्हेरिफिकेशन केलेली म्हणजे निळी टिकमार्क केलेली आहेत. त्यामुळे कोणीही इतर अकाउंटसोबत संपर्क ठेवू नये जर आपणास कोणी खोटा फोन केला असल्यास आपण खामकर यांच्याशी अथवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुहास खामकर यांनी केले आहे.