नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. राजस्थानमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भाषण दिल्यानंतर अवध्या तासाभरात पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. माधोपूरमध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
डीएसपी मीणा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण केलं. "आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा" असं आवाहनही मीणा यांनी लोकांना केलं होतं.
भाषणानंतर अवघ्या एक तासात झाली अटक
डीएसपी मीणा यांना विशेष म्हणजे भाषणाच्या एक तासानंतर तब्बल 80 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यालाही अटक झाली आहे. एसीबीच्या कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला एसीबीला अनेक प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करु शकते.
एसीबीचे महासंचालक बीएल सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोटा येथील आकाशवाणी कॉलनीत राहणाऱ्या डीएसपी भैरुलाल मीणा जे सवाई माधोपूरमधील एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिकाऱ्यांना बोलावून ते पैसे घेत असतं. त्यामुळे एसीबीची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून होती"
"बुधवारी या चौकात एसीबीची टीम पोहोचली तेव्हा करौली येथील दलपूरा येथे राहणाऱ्या डीटीओ महेशचंद मीणा त्यांना मासिक हप्त्याचे 80 हजार रुपये देत होते. दरम्यान डीएसपी मीणा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एसीबीच्या टीमला जमिनींची कादपत्रे आणि 1.61 लाख रोख रुपये आढळून आले. आता एसीबीची टीम त्यांच्या अन्य ठिकाणांचा शोध घेत आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
स्पेशल टास्क फोर्सची मोठी कारवाई! घरात सापडले घबाड, तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड जप्त
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ने मोठी कारवाई केली होती. घरामधून तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. यासोबतच सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले होते. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्क स्ट्रीट येथील एलियट रोडवर टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. घरातील सदस्यांना घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याबाबत विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत.