बालासोर : वैवाहिक जीवनातील वाद मिटवण्याच्या बहाण्याने ओडिशातील एका तांत्रिकाने एका महिलेवर 79 दिवस बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान महिला व तिच्या अडीच वर्षाच्या निष्पाप मुलाला खोलीत ओलीस ठेवून मुलासमोर महिलेवर अत्याचार केला. पोलिसांनी बंद खोलीतून महिला आणि तिच्या मुलाची सुटका केली, मात्र तांत्रिक पळून जाण्यात यशस्वी झाला. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पती आणि सासरच्या लोकांवर आरोप केले आहेत. महिलेच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये तिचे लग्न झाले होते. तेव्हापासून हुंड्यासाठी सासरच्या घरी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. वैवाहिक जीवनातील वाद मिटवण्यासाठी तिचा पती आणि सासरच्यांनी तांत्रिकाशी संपर्क साधला. त्यावेळी तांत्रिकाने सांगितले की, महिलेला काही महिने आपल्याकडे सोडले तर सर्व काही ठीक होईल. मात्र महिला यासाठी तयार नव्हती.
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला की, एके दिवशी तिच्या सासूने तिच्या जेवणात अमली पदार्थ मिसळून तिला खाऊ घातले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. डोळे उघडल्यावर तिला तांत्रिकाच्या खोलीत असल्याचे समजले. जवळच तिचा अडीच वर्षांचा मुलगा होता. तांत्रिकाने निष्पाप मुलासमोर सतत बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. हे सर्व 79 दिवस चालले. महिलेच्या म्हणण्यानुसार, 28 एप्रिल रोजी तांत्रिक त्याचा फोन रूममध्ये विसरला होता. त्यावेळी संधी पाहून महिलेने तांत्रिकाच्या फोनवरून आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले.
यानंतर महिलेने सर्व प्रकार सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलिस तांत्रिकाच्या अड्ड्यापर्यंत पोहोचले, तोपर्यंत तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तक्रारीत तिचा पती, दीर आणि इतर सासरची नावेही नोंदवली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.