ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ३५ जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 07:24 PM2020-03-14T19:24:27+5:302020-03-14T19:27:24+5:30
शुक्रवारी सायंकाळी या घटनेत भा. दं. वि. कलम 341 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोपाळ - काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी शिंदे विमानतळावर जात असताना त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. कमला पार्क परिसरात त्याला काळे झेंडे देखील दाखवले गेले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी संध्याकाळी येथे राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते.
ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप
भोपाळ - ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ३५ जणांवर गुन्हे दाखल https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2020
शहरातील कमला पार्क भागात शिंदे यांची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा दावा चौहान यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी दगडफेकीची घटना नाकारली आणि शिंदे यांना काळे झेंडे दाखविल्याचे सांगितले. शहरातील एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर शिंदे भोपाळ येथे विमानतळावर जात होते. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी श्यामला पोलीस ठाण्याला घेरावही घातला. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास विरानी, माजी महापौर आलोक शर्मा, भाजपचे कार्यकर्ते व जिल्ह्यातील पक्ष अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. श्यामला हिल्स पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी या घटनेत भा. दं. वि. कलम 341 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण शुक्रवारी संध्याकाळी कमला पार्क परिसरातील शिंदे यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे.