मीरा रोड - मैं भी चौकीदारची भाजपाने लावलेली जाहिरात बेकायदा असल्याने भरारी पथकाने ती काढून टाकून त्याविरोधात आचारसंहिता भंग व मालमत्ता विद्रूपण कायद्यानुसार काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर २७ मार्च रोजी आलेली बेकायदा जाहिरातीची एका नागरिकाने केलेली तक्रार आचारसंहितेच्या भरारी पथक क्र.-२ ला मिळाली. पथकातील नोडल अधिकारी नरेंद्र चव्हाण, विशाल देवरे, किशोर घरत, कुमेश राठोड यांच्या पथकाने या तक्रारीनुसार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरानाक्याजवळ ए.जी.नगर इमारतीच्या आवारात असलेल्या खाजगी होर्डिंगची पाहणी केली.या होर्डिंगवर भाजपाची मैं भी चौकीदारची जाहिरात लावण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र, भाजपाचे निवडणूक चिन्ह, मैं भी चौकीदार कार्यक्रमात मोदींशी थेट जोडा, तसेच भ्रष्टाचार मिटाना है आदी मजकूर होता. या राजकीय जाहिरातीसाठी परवानगीच घेण्यात आली नव्हती.पथकाने त्वरित ही जाहिरात काढून घेत होर्डिंगचे मालक असलेले साई अॅडव्हर्टायझिंगचे मन्सुर मेमन, रा. कृष्णानगरी, बोरिवली (पश्चिम) विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग व मालमत्ता विद्रूपण कायद्याखाली चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जाहिरात कोणी लावण्यास दिली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मैं भी चौकीदारची जाहिरातसुद्धा भाजपा भ्रष्टमार्गाने करत आहे. याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करावा. नागरिकांना चौकीदारचा उपदेश देणारे भाजपाचे चौकीदारच चोर आहेत, हे दाखल गुन्ह्यावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.- अंकुश मालुसरे,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस