औरंगाबाद : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली अनिश दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.२८ ) दिले.
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दमानिया यांच्या म्हणण्याप्रमाणे, भुजबळ यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दमानिया यांना खडसे आणि भुजबळांच्या विरोधातील प्रकरणे मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. काही दिवसांनी, भुजबळांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी दमानियांवर आरोप केले. खडसेंना पैशाच्या आरोपात अडकविण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केल्याचे त्यांनी म्हटले होते.
यानंतर खडसेंनी दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून दमानियांविरुद्ध भादंवि कलम ४५२, १८६, १२० (ब), १४९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. या तक्रारीवरून पोलिसांची चौकशी सुरू झाली होती. यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती दामानिया यांनी याचिकेत केली होती.
सुनावणीदरम्यान युक्तिवाद करण्यात आला की, दमानिया यांच्याविरुद्ध ऐकीव माहितीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही. केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल केला. याचिकेत एकनाथ खडसेंसह, राज्य शासन आणि पोलीस निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आले होते. सुनावणीअंती दमानियांवर यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित, राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, दमानिया यांच्यातर्फे अॅड. सतेज जाधव यांनी काम पाहिले.