घराची साफसफाई करताना नोकराला सापडलेल्या जुन्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आढळले. नंतर नोकराने मालकाला ब्लॅकमेल केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. घरात साफसफाईसाठी येणाऱ्या नोकराला खराब झाल्यामुळे अडगळीत फेकून दिलेला एक मोबाईल सापडला. तो मोबाईल त्याने दुरुस्त करून घेतला आणि त्यात त्याला घऱमालक तरुण आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सापडले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणाकडे १ लाख रुपये मागितले.
भोपाळमधील एका तरुणाच्या घरी शाहरूख खान नावाचा नोकर साफसफाईकरिता येत होता. एक दिवस त्याला खराब झालेला मोबाईल सापडला. तो दुरुस्त केल्यावर त्यातील फोटोंचा वापर करून त्याने तरुणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा डाव आखला. एका Whats App अकाउंटवरून त्याने तरुणाला संपर्क साधत ते फोटो पाठवले. हे फोटो व्हायरल न कऱण्याच्या मोबदल्यात त्याने १ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने वेगवेगळ्या ५ बनावट फेसबूक अकाऊंटच्या माध्यमातून हे फोटो व्हायरल केले.
तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहरूख खानला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल फोन जप्त केला असून काही सिमकार्ड देखील हस्तगत केली आहेत. तरुणाने वेगवेगळे पाच फेसबुक अकाऊंट तयार करून फोटो व्हायरल केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.