नागपूर : एका तरुणाला पार्ट टाईम जॉबची ऑफर देत सायबर गुन्हेगारांनी गुंतवणूकीच्या जाळ्यात ओढले आणि २.४३ लाख रुपये लुबाडले. आश्चर्याची बाब म्हणजे सायबर गुन्हेगारांनी एचआर मॅनेजर असल्याची बतावणी केली होती. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अंकीत रामकिशोर भुतडा (३२, छाप्रुनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. २३ मार्च रोजी त्याला ९१६४४३५२९० या मोबाईल क्रमांकावरून मॅसेज आला व समोरील व्यक्तीने पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली. समोरील व्यक्तीने तो ग्लोबल ॲफिलेट ग्रुप कंपनीचा एचआर मॅनेजर असल्याचे सांगितले. अंकितने त्याच्यावर विश्वास ठेवला व समोरील व्यक्तीने त्याला युट्यूब ब्लॉगरच्या प्रमोशनचे काम असल्याची बतावणी केली. त्यानंतर काही ठराविक टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असेदेखील आमीष दाखविले.
अंकितने सुरवातीला काही रक्कम गुंतवली व आरोपींनी त्यावर चांगला परतावा दिला. त्यामुळे अंकीतचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने अंकीतकडून २.४३ लाख रुपये उकळले व त्यावर कुठलाही परतावा दिला नाही. अंकीतने विचारणा केली असता समोरील व्यक्ती टाळाटाळ करायला लागला. आपली फसवणूक झाली असल्याचे अंकीतच्या लक्षात आले. त्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.