नागपूर : प्रेयसी आणि पोलिसांनी संगनमत करून लाखोंची खंडणी उकळल्यानंतर प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली. मृत्युपूर्वी त्याने ब्लॅकमेलर प्रेयसी आणि खंडणीबाज पोलिसांच्या पापाचा पाढा लिहून ठेवल्याने ठाणे जिल्हा पोलिसांनी नागपुरातील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील एका पीएसआयला अटक केली आहे. (officer commits suicide due to Beloved and police harassment)सचिन चोखोबा साबळे (३८) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते मूळचे पुण्याचे होते. आरोपी महिलेचे (प्रेयसी) नाव नीता मानकर-खेडकर आहे. पोलिसांनी नीता, तिची मुलगी, तिचा भाऊ दादा मानकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि मेश्राम नामक अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी केले असून, पीएसआय चव्हाणला अटकही केली.मृत्यूपूर्वी सचिन साबळे मुंबईला (गोरेगाव पूर्व) बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरोपी नीता हीसुद्धा याच विभागात कार्यरत असल्याने सचिनसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. नीताचा नवरा एसटीत ड्रायव्हर होता. त्याला पत्नीच्या संबंधाची माहिती झाल्याने त्याने डिसेंबर २०२० मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्याचा तपास पीएसआय चव्हाणकडे होता. त्याने नीताशी संगनमत करून सचिन साबळेंना पद्धतशीर ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुमच्या अनैतिक संबंधामुळे नीताच्या पतीने आत्महत्या केली. त्यामुळे तुम्हाला आरोपी बनविण्यात येईल. ते टाळायचे असेल तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले.साबळेंनी मुंबईहून येऊन मासुरकर नामक व्यक्तीच्या हाताने तत्कालीन ठाणेदार दुर्गे यांना साडेचार लाख रुपये दिले. काही दिवसांनी चव्हाणने साबळेंना फोन करून विविध कारणे सांगत आधी दोन लाख व नंतर तीन लाख रुपये मागितले. चव्हाणच्या नातेवाइकाने मुंबईत जाऊन साबळेंकडून दोन लाख वसूल केले. पोलीस खंडणी वसूल करीत असतानाच नीता हिने साबळेंमागे लग्नासाठी तगादा लावला. तिची मुलगी आणि नीताचा भाऊदेखील साबळेंना धमकावू लागले. सततचे फोन, व्हॉट्सॲप चॅटिंग करून या मंडळींनी कोंडी केल्याने अखेर १८ फेब्रुवारीला साबळेंनी यांनी आत्महत्या केली.
चव्हाण निलंबित, दुर्गे, मेश्रामवरही कारवाई -चव्हाणला निलंबित केले असून, दुर्गेविरुद्धही कारवाई होणार आहे. मेश्राम या प्रकरणात लाभार्थी आहे की त्याचे नाव वापरून चव्हाणने पुन्हा तीन लाख हडपण्याचा प्रयत्न केला, ते स्पष्ट न झाल्यामुळे त्याच्यावरच्या कारवाईसाठी विचार सुरू असल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.