लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन विभागातील काटोल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील राऊंड ऑफिसर शरद रामराव सरोदे (५७) यांना ३६५० रुपयाची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.तक्रारदार हे भाटपुरा काटोल येथील रहिवासी आहेत. ते खासगी कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदाराने गेल्या महिन्यात ३ डिसेंबर २०१९ रोजी मौजा बाभुळखेडा ता. काटोल जि. नागपूर येथील शेतामध्ये असलेल्या सागवानाची झाडे तोडण्याचा करार शेतमालकाकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केला. तसेच ही झाडे कापण्याची परवानगी मिळावी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर केला. या अर्जासंदर्भात मोका पंचनामा करण्याकरिता राऊंड ऑफिसर शरद सरोदे यांनी तक्रारदारास ३६५० रुपयाची लाच मागितली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी याबाबत नागपुरातील एसीबी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरीत्या शहानिशा केली. त्यानंतर बुधवारी लाचखोर अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्यानुसार तक्रारकर्त्याने लाच देण्याची तयारी दर्शविली. सरोदे याने काटोल वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर असलेल्या चहाच्या टपरीवर लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. सरोदेविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात संजीवनी थोरात, योगिता चाफले, रविकांत डहाट, मंगेश कळंबे, रेखा यादव, राजेश बंसोड यांनी केली.
काटोल वन विभागातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:01 AM