पुणे : बांधकाम व्यवसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतर आरोपींनी पूर्व नियोजित कट करून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या कटात बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्मचारी देखील सहभागी असून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी सादर केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात बँक आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करून अनेक गैरकृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे.पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून शुक्रवारी सहा आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या न्यायालयात १ हजार ६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी (वय ३३), जावई केदार प्रकाश वांजपे (वय ४०), पुतणी सई वांजपे (वय ३७) डीएसकेडीएल कंपनीचा कार्यकारी संचालक धनंजय पाचपोर (वय ३९), महाव्यवस्थापक विनयकुमार बडगंडी (वय ५१), मेहुणी अनुराधा पुरंदरे (वय ६१) यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र आहे.याप्रकरणी १४ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्विनी संजय देशपांडे, शिल्पा मकरंद कुलकर्णी, स्वरुपा मकरंद कुलकर्णी, तन्वी शिरीष कुलकर्णी आणि मकरंद सखाराम कुलकर्णी यांचा पोलीस शोध घेत आहेत.
महाराष्ट्र बँकेचे पदाधिकारीही डीएसके गैरव्यवहारात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 5:09 AM