बार्टो - अमेरिकेतील बार्टो परिसरातल्या एका शाळेमध्ये धक्कादायक घटना शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे सुदैवाने टळली आहे. 11 आणि 12 वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी अतिशय भयंकर कट रचला होता. या दोघींनी त्यांच्या शाळेतील लहान मुलांना ठार मारून त्याचं रक्त पेल्यातून पिण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी सुरा, पिझ्झा कटर, कात्री यासारखी शस्त्रही जमा केला होता. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या दोघीजणींनी हा अघोरी कट रचला होता.
बार्टो मिडल शाळेतील एका शिक्षिकेला या दोघी विद्यार्थिनी बाथरूममध्ये दबक्या आवाजात बोलताना दिसल्या होत्या. शिक्षिकेने थोडं लपूनछपून त्या काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिक्षिकेला दोघींच्या कटाबद्दल माहिती मिळाली. बाथरूमला येणाऱ्या छोट्या मुलींची त्या दोघी वाट पाहत होत्या. छोट्या मुली जास्त प्रतिकार करू शकणार नाही हे माहिती असल्यानं त्यांनी 4-5 वर्षाच्या मुलींना टार्गेट बनवण्याचं ठरवलं होतं. या दोघींनी किमान १५ मुलींना ठार मारून त्यांचं रक्त पिण्याचं ठरवलं होतं. रक्त प्यायल्यानंतर आत्महत्या करण्याचे दोघींनी ठरवलं होतं. दोघींच्या घरी सापडलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे.