रिसोड पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन हिंगोली हद्दीत हिंगोली - रिसोड रोडवर आज तब्बल ३ कोटी ६५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात यश प्राप्त झालं आहे. आयशर ट्रकमधून वाशिम हद्दीतून गांज्याची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक वाशीम यांचे निदर्शनास आणून दिली.
मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक हिंगोली ते रिसोड रोड येथे नेमून सापळा रचण्यात आला. त्यांनतर गांजाची वाहतूक करणारा ट्रक ( क्रमांक एम एच २८ बीबी ०८६७ ) याची झाडाझडती घेतली. त्यामध्ये अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करण्यात येत होती असं स्पष्ट झाले. या प्रकरणी गोटीराम गुरदयाल साबळे (५२) रा . कुऱ्हा ता . मोताळ जि . बुलढाणा, सिध्दार्थ भिकाजी गवांदे रा.निमगाव ता.नांदुरा जि . बुलढाणा, प्रविण सुपडा चव्हाण रा . हनवतखेड ता . मोताळा जि . बुलढाणा, संदिप सुपडा चव्हाण रा . हनवतखेड ता . मोताळा जि . बुलढाणा अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आले. पोल्ट्री फीड या ट्रकमधून घेऊन जाण्याचा बनाव रचून पोल्ट्री फीडच्या खाली गांजा लपवून ठेवला होता. आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यातून हा गांजा मागवण्यात आला असल्याचं तपासात समोर आलं आहे.