मुंबई - एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीमुळे टीसीला त्याचावर संशय आला आणि या प्रवाशाची झाडाझडती घेताच त्याच्याकडे तब्बल १७ किलो सोन्याचं घबाड सापडलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं घेऊन जाणाऱ्या या प्रवाशाला टीसीच्या सतर्कतेमुळे बोरिवली आरपीएफने ताब्यात घेतले आहे. प्रवाशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेलं सोनं पाहून रेल्वे पोलीसही चक्रावले आहेत. हा प्रवासी मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सुर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होता. टीसीच्या प्रसंगावधनामुळे हा प्रकार उघडकीस आला. मनीष एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.
सोन सापडलेल्या प्रवाशाचं नावं मनीष असं आहे. तो मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. सूर्यनगरी एक्सप्रेसमधील एस-९ या कोचमध्ये तो बसला होता. तो मुंबईहून सुरतला १७ कोटी रुपयांचं सोनं घेऊन प्रवास करत होता. दरम्यान तिकीट चेक करताना टीसीला या प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीवर शंका आली. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मनीषला ताब्यात घेतलं आणि त्याची झाडाझडती घेताच त्याच्याकडं १७ कोटींचे सोनं सापडलं. सोनं सुरतला पोहोचविल्याच्या बदल्यात कमिशन मिळणार असल्याची कबुलीही मनीषने पोलिसांना दिली. पोलिसांनी या सोन्याचं वजन केलं असता ते १७ किलोपेक्षा जास्त भरलं. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ५ कोटीपेक्षा १० लाख रुपये आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.