नवी मुंबई : अमेरिकेत स्थायिक असलेल्या मुलाने वडिलांकडे मागितलेले तेल साडेचार लाखांना पडले आहे. ऑर्डर केलेले ऑनलाइन तेलचे पार्सल मिळल्याने त्यांनी गुगलद्वारे मिळवलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्यावेळी पार्सलवरील दंडाच्या बहाण्याने बँक खात्यातून साडेचार लाख उडवले.
वाशी परिसरात राहणाऱ्या ७७ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक असून, तेदेखील लवकरच अमेरिकेत जाणार आहेत. यामुळे अमेरिकेला येताना एका मुलाने त्याच्या केस गळतीवर भारतीय आयुर्वेदिक औषध मागवले होते. परंतु वडिलांना ते ऑनलाइन शोधूनदेखील न सापडल्याने अमेरिकेतील मुलानेच ऑनलाइन ऑर्डर दिली होती.
त्यासाठी वाशीतील घराचा पत्ता दिला होता. परंतु दुसऱ्या दिवशी तेल घरपोच न झाल्याने वडिलांनी कुरियर कंपनीची ऑनलाइन हेल्पलाईन शोधून त्यावर संपर्क साधला होता. यावेळी फोनवरील व्यक्तीने पार्सलमुळे दहा रुपयांचा दंड झाल्याचे त्यांना सांगून दंड भरण्यासाठी लिंक पाठवली होती.
अशी केली लूट
विश्वासाने त्यांनी ऑनलाइन दंड भरला असता पुढील काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून सलग ११ वेळा वेगवेगळी रक्कम कापली जाऊन एकूण ४ लाख २६ हजार रुपये उडवले गेले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असून, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.