मुंबई - तेल माफियांच्या मुसक्या मुंबई पोर्ट ट्रस्टने आवळल्यानंतर छुप्या पद्धतीने प्रवाशी बोटीतून माफियांनी तेल तस्करी सुरू केली आहे. या प्रकरणी नुकतीच पोर्ट झोनच्या यलोगेट पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हरेश गजानन पांचाळ (४१), नितिन यशवंत कोळी (३८),सोहेल नेरुरकर (३५), सुभाष कोळी(५३) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या प्राचीन एलिफंटा लेण्या पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर समुद्राचा फेरफटका मारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गेट वेजवळ येतात. गेट वे ते एलिफंटा तसंच अलिबागला बोटीने प्रवाशी ये - जा करत असतात. वाढत्या इंधन वाढीमुळे बोट चालक समुद्रातील तेल तस्करांकडून कमी किंमतीत तेलाची खरेदी करण्यास सुरूवात केल्याची माहिती पोर्ट झोन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी समुद्र परिसरात गस्ती वाढवली होती. नुकतेच जय हनुमान (IND-MH-7-MM-2464) ही मच्छिमारांची बोट समुद्रात संशयास्पदरित्या फिरताना आढळली. पोलिसांनी या बोटीची तपासणी केली असता बोटीत खालच्या डेकमध्ये ३ हजार लिटर तेल आढळले. हे तेल विक्रीसाठी नेले जात होते.