जळगाव : शहरात बारा दिवसापूर्वी सशस्त्र दरोडा पडल्यानंतर त्याचा तपास लागलेला नसतानाच रविवारी पहाटे पुन्हा खेडी येथे वृध्द आई दाम्पत्य व १२ वर्षाच्या नातवाला घरातीलच बॅटने बेदम मारहाण करुन कपाटातील रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटे साडे तीन वाजता घडली. या घरात प्रवेश करण्यापूर्वी चोरट्यांनी याच परिसरातील यमुना नगरात विजय सुखदेव चव्हाण यांच्या घरातून सुटकेस लांबविली तर गुरुदत्त नगरात योगेश भानुदास पाटील यांच्याकडेही असाच प्रयत्न केला, मात्र जागे झालेल्या पाटील यांनी दम भरुन शिवीगाळ करताच त्यांनी तेथून पळ काढला. एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या या घटनांनी खेडी हादरली आहे.
नंदूरबार पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश जगन्नाथ भोळे यांचे खेडी येथे गावाच्या बाहेर श्रीकृष्ण मंदिराजवळच दुमजली घर आहे. मोठा भाऊ विकास आर्मीमध्ये असून दोन्ही भाऊ नोकरीच्या ठिकाणी आहेत तर घरी वडील जगन्नाथ शंकर भोळे, आई सुशीलाबाई व मोठ्या भावाची पत्नी हर्षा, त्यांचा मुलगा जीवांश असे राहतात. शनिवारी सकाळी भाचा सिध्दांथ अनिल दांडगे (१२) हा घरी आलेला होता. वृध्द दाम्पत्य व सिध्दांथ एका खोलीत तर हर्षा व त्यांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. पहाटे साडे तीन वाजता मागील लोखंडी गेटवरुन उडी घेऊन तीन जण आतमध्ये आले. टॉमीने दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एकाने दरवाजाच्या बाजुला ठेवलेली बॅट त्याच्या नातवाच्या खांद्यावर मारली. धावून आलेल्या सुशीलाबाई यांच्या हातावर तर जगन्नाथ भोळे यांच्या डोक्यात बॅट घातली. रक्तबंबाळ झालेले भोळे जागेवरच बेशुध्द पडले. काही क्षणातच चोरटयांनी सुशीलाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले व कपाटातील रोख रक्कम व दागिने घेऊन मागील दरवाजाने शेताच्या दिशेने पळ काढला.