सेनगाव : तालुक्यातील येथील बरडा येथे तुरीच्या शेताला राखण असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. वामन लक्ष्मण शेंडगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बरडा येथील वामन लक्ष्मण शेंडगे यांच्या शेतात तुरीचे पीक जोमदार आले आहे. जनावरे शेतातील पिकांचे नुकसान करत असल्याच्या घटना वाढल्याने शेंडगे शेतात राखण करण्यासाठी जात असत. गुरुवारी रात्री सुद्धा शेंडगे शेतात राखणीला गेले होते, मात्र सकाळी उशिरा पर्यंत ते घरी परतले नाहीत. यामुळे शेंडगे यांचा मुलगा त्यांच्या शोधार्थ शेतात गेला. यावेळी तुरीच्या शेतात शेंडगे यांचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या घटना आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
आठ दिवसात दुसरी घटना सेनगाव तालुक्यात मागील आठ दिवसात खुनाची दुसरी घटना उघडकीस आली आहे. आठ दिवसांपूर्वी तळणी येथील शेत शिवारात एका महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. विशेष म्हणजे या खुनाचे घटनास्थळ आणि बरडा येथील आज मृतदेह आढळून आलेले घटनास्थळ हे एकाच शेत शिवाराचा भाग आहेत.