कल्याण - तीन तोळे वजनाचे सुमारे दोन लाख रूपयांचे गहाळ झालेले सोन्याचे ब्रेसलेट जाहीदा शेख ईसार या ६० वर्षीय वृध्द महिलेने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे संकेत ढेरंगे यांना पुन्हा मिळाले. कल्याणमध्ये झाडू, सुपडे विकून आपल्या कुटुंबाची गुजराण करणा-या जाहीदा यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेश तरडे यांनी जाहीदा यांच्यासह ढेरंगे यांचा शोध घेऊन ब्रेसलेट सुपूर्द करणारे वाहतूक पोलिस हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे आणि वॉर्डन संतोष घोलप यांचाही सत्कार केला.
कल्याणमधील चाणक्य नगर श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणारे संकेत संजय ढेरंगे हे गुरूवारी सकाळी महात्मा फुले चौकातील एका हॉटलेमध्ये नाश्ता करीत होते. नाश्ता झाल्यावर हॉटेल मधून बाहेर पडताना त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट त्यांच्या नकळत गहाळ झाले. ते त्यांच्या कारमधून निघून गेले. दरम्यान त्या चौकात झाडू, सुपडे विक्री करणारी महिला जाहीदा शेख ईसार यांना त्या परिसरात एक ब्रेसलेट सापडले. ही बाब त्यांनी त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे आणि वॉर्डन संतोष घोलप यांना सांगितली. त्यांनी सीसीटिव्हीच्या मदतीने ढेरंगे यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान ब्रेसलेट गहाळ झाले म्हणून ढेरंगे हे देखील पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी जात असताना वाहतूक पोलिसांनी त्यांना ओळखले आणि ब्रेसलेट सापडले असल्याची माहीती देत ते त्यांच्याकडे सुपूर्द केले.