पालघर : आपल्या सेवानिवृत्तीनंतर वार्धक्याच्या काळात उपयोगी पडावी म्हणून साठवून ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७० हजारांचा ऐवज घरातून लुटून नेल्यानंतर संकटात सापडलेल्या धनसार येथील ७८ वर्षीय शालिनी मोरे या सेवानिवृत्त शिक्षिका आपला ऐवज मिळावा म्हणून पोलीस ठाण्यासह लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवीत आहेत.
मूळ सातपाटी गावच्या मात्र धनसार येथे स्थायिक झालेल्या शालिनी मोरे या शिक्षिका सातपाटी सरकारी मत्स्योद्योग माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. २५ जानेवारी रोजी त्या आपल्या घरातील कामकाज आटोपून सकाळी १० वाजता जवळच असलेल्या शेतात कामानिमित्त निघून गेल्या. शेतावरचे काम आटोपून अर्ध्या-पाऊण तासाने घरी येत दरवाजा उघडला असता दरवाजा आतून लॉक केल्याचे दिसून आले. घराच्या मागच्या बाजूने खिडकी तोडलेली आणि दरवाजा उघडून घरातील कपाट फोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची माळ, अंगठी, रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मी नेहमी शेतावर कामासाठी जात असल्याची पाहणी (रेकी) करून चोरट्याने आपल्या दागिन्यांवर हात मारल्याचा संशय निवृत्त शिक्षिकेने व्यक्त केला आहे. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी अजूनही पोलिसांच्या तपासात कुठलीही प्रगती दिसून येत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जगण्याचा आधार वार्धक्याच्या काळात जगण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ऐवजच चोरीला गेल्याने माझ्या जगण्याचा आधार निघून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेऊन माझा ऐवज मला परत मिळवून द्यावा, अशी मागणीवजा विनंती त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्याकडे केली आहे.